गौतम संचेती, नाशिक
नाशिक लोकसभा मतदार संघात शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे आपआपसात लढणा-या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारचे गणित बिघडणार आहे. ज्या ठिकाणी महाराजांचा भक्त परिवार आहे. त्यातील बहुतांश मते ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना याचा मोठा फटका बसणार आहे. शांतीगिरी महाराज यांच्या प्रमाणेच अनेक गोष्टी या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना कुठे फायद्याचे तर काही ठिकाणी नुकसान देणा-या आहेत.
गेल्या तीन निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही गोडसे विरुध्द भुजबळ अशीच होती. त्यामुळे निवडणुकीत मराठा विरुध्द ओबीसी असा वाद असायचा आहे. या निवडणुकीत भुजबळ उमेदवार नसल्यामुळे येथील गणितही बदलले आहे. आता मराठा समाजाचे चार प्रबळ उमेदवार रिंगणात असून त्यांच्यात मराठा समाजाची मते विभागली जाणार आहे. त्याचाही फटका शिवसेनेच्या या दोन्ही गटाच्या उमेदवारांना बसणार आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेना ही एकसंघ होती व त्याची भाजपबरोबर युती होती. तर विरोधात राष्ट्रवादी व काँग्रेस होती. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. त्यात शिंदे गटाची ताकद मतदार संघात कमी आहे. तर ठाकरे गट अजूनही प्रबळ आहे. पण, शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजप व रिपाइंची नेहमीप्रमाणे साथ आहे. तर राष्ट्रवादी व मनसेचा पाठींबा असल्यामुळे त्यांची ती भर येथून निघणार आहे. ठाकरे गटाची सेना प्रबळ असली तरी त्यांना पाठींबा असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर मित्र पक्ष इतके प्रबळ नाही. पण, मुस्लिम व इतर मते त्यांच्या पारड्यात जाणार असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होणार आहे. त्यात सिन्नर येथून राजाभाऊ वाजे यांना चांगला लीड मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाकडे एकही आमदार नाही. या मतदार संघात भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन व एक काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे त्याच्या ताकदीवर हेमंत गोडसे यांची निवडणूक कितपत यशस्वी होते हे मतदानाच्या दिवशीच दिसणार आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सिन्नर बरोबरच इगतपुरीतून चांगला प्रतिसाद मिळतांनाचे चित्र आहे. पण, उर्वरीत चार मतदार संघात त्यांना जास्तीची मते मिळवणे इतके सोपे नाही. या चार मतदार संघात वाजे यांना जोर लावावा लागणार आहे.
विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत वरवर शिवसेनेच्या दोन्ही गटात ही निवडणूक असली तरी शांतीगिरी महाराजांची भक्तांची ताकद किती याचा अंदाज अद्याप कोणालाच आलेला नाही. अडीच लाखाच्या आसपास त्यांचा भक्त परिवार आहे. त्यामुळे त्यांनी जर ताकदीने या निवडणुकीत मतदान केले. तर शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांचे गणित बिघडेल व शांतीगिरी महाराजांचे पारडे जड होईल.
त्याचप्रमाणे वंचितचे करण गायकर हे किती मत घेतात व ते कोणाला धक्का देतात हे सुध्दा या निवडणुकीत महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलन जरांगे पाटील यांनी हातात घेण्याअगोदर नाशिक हे केंद्र होते. या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे वारंवार येत होते. त्यानंतर त्यांनी उमेदवारीची तयारी सुध्दा केली. त्यांच्याबरोबर किरण गायकर हे पूर्ण मतदार संघ पिंजून काढायचे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे सुध्दा महागात पडणार आहे. मराठा समाजाच्या मतांबरोबरच वंचितची मते त्यांना बोनस मिळणार आहे.
वरवर हे प्रमुख मुद्दे या निवडणुकीत असले तरी मोदींनाच मते देणारा वर्ग, ठाकरेवर असलेली श्रध्दा, मराठा आरक्षणावर संताप, महागाई, बेरोजगारी, यासारखे अनेक मुद्दे आहे. त्यात राज्यातील बिघडलेले राजकारणाची चीडही अनेकांच्या मनात आहे. या सर्व प्रश्नांमुळे मतदारांचा कल कसा आहे हे अद्याप स्पष्ट नाही. तो बहुतांश ठिकाणी समीश्रच दिसत आहे. पण, तो येत्या काही दिवसात स्पष्ट होईल..
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे सहा दिवस बाकी आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर या सर्व दिग्गज नेत्यांच्या सभा रोड शो आता होणार आहे. त्यानंतर या मतदार संघाची हवा बदलेल. पण, ती कोणासाठी हे समजण्यसाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.