नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमृतधाम तारवाला लिंकरोड भागात नव्याने सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी साहित्य चोरून नेले.या घटनेत लोखंडी प्लेटा व कटर असा सुमारे ३८ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान दगडूजी निकाळजे (रा.माडसांगवी टोलनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकाळजे नोवा हॉस्पिटल समोर नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करतात. या साईटवरील तळमजल्यावर ठेवलेल्या २५ लोखंडी प्लेटा,लाकडी व लोखंडी कटर मशिन असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.
३८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रविण शिवसिंग परदेशी (रा. कपालेश्वर रो हाऊस,जलकुंज समोर आण्णाभाऊ साठे नगर शिवाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. परदेशी यांनी सोमवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरात बेडरूममध्ये छताच्या झोक्यास गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.