इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबईत वादळी पावसानंतर सोमवारी पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत १४ जणांचे बळी गेल्याचे समोर आले आहे. घाटकोपर येथे झालेल्या या अपघातात ७५ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ४३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला आणि या पंपाशेजारचे होर्डिंग्ज त्यांच्यासाठी काळरात्र ठरले. पंपालगत उभारलेले एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर कोसळले. या होर्डिंगखाली तब्बल ८० वाहने अडकली. पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला इथे गॅस कटर वापरता येत नव्हता. १३ जणांचा मृत्यू राजवाडी रुग्णालयात, तर एकाचा मृत्यू सायन रुग्णालयात झाला. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे, अशी घोषणा शिंदे यांनी केली.