इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील अल्लाहबख्शपूर टोल प्लाझाजवळ सोमवारी मध्यरात्री चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.
या महामार्गावर चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटल्यामुळे ती दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. त्यानंतर या कारला एका भरधाव वेगातील ट्रकची धडक बसली त्यातून हा भीषण अपघात झाला. वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढता आले नाही. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कार कापून सर्व जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मृत्यू झालेले गाझियाबादच्या लोणी भागातील रहिवासी होते.
या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे तासाभरानंतर पोलिसांनी महामार्गावरून वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.