पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.
सीओईपी विद्यापीठ मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवेगार रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पहिला टप्पा ९ किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरण्यासाठी चांगली सुविधा मिळणार आहे. या परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षाचा विचार करून विकासकामे करण्यात येत आहेत.
कचरा संकलनासाठी पर्यावरणपूरक विद्युत वाहने घेण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीदेखील विद्युत बसेस घेण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुदतीत मिळकतकर भरलेल्या नागरिकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, नागरिकांनी वेळेत मिळकत कर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून १ कोटी रुपयांची ४५ बक्षिसे देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ६ लाख ६० हजार ७८५ मिळकतधारकांनी मुदतीत कर भरला. त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३०० कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. इतरही महानगरपालिकांनी अशा स्वरूपाचा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी लॉटरी उपक्रमाची माहिती दिली. मिळकतकरातून येणारी रक्कम शहराच्या विकासासाठी उपयोगात आणली जाते. वेळेवर कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याने यावर्षी मिळकतकरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांची किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख असून एका फेरीत १.५ ते २ टन कचऱ्याची वाहतूक होणार आहे.