नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तट रक्षक दलाने 12 मे 2024 रोजी नैऋत्य मुंबई पासून 27 सागरी मैलावर ‘आई तुळजाई’ नावाची मासेमारी नौका त्यावरील चार कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली. डिझेल तस्करी करणाऱ्या या संशयित बोटीला भारतीय तट रक्षक दलाच्या वेगवान गस्ती नौका आणि इंटरसेप्टर नौकेने ही कारवाई केली.
ताब्यात घेतलेल्या नौकेचा अत्यंत बारकाईने तपास केला तेव्हा त्यात अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचे सुमारे 30,000 लिटर अवैध डिझेल सापडले. पकडलेले मासे ठेवण्याच्या टाक्यांमध्ये हे डिझेल लपवलेले होते. तसेच, 1.75 लाख रुपये बेहिशेबी रोकडही नौकेवरून जप्त करण्यात आली. नौकेवरून अटक केलेल्या कर्मचाऱ्यांनी बेकायदा माल संशय घेणार नाहीत अशा मच्छिमारांना विकण्याचा आपला बेत होता, अशी कबुली दिली.
ताब्यात घेतलेली नौका भारतीय तट रक्षक दलाच्या मध्यस्थी नौकेने मुंबई बंदरात आणली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिथे ती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. या बेकायदा कृत्याविरोधात समावेशी कायदेशीर कारवाई व्हावी या हेतुने इतर किनारा सुरक्षा विभाग जसे की पोलीस, मत्स्य विभाग आणि महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले.