नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात अपघाताची मालिका सुरुच असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. याबाबत अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात शिंदेगावाकडून नायगावकडे जाणाºया मार्गावर झाला. भुषण विठ्ठल सुर्यवंशी (३० रा. चांदोरी ता.निफाड) हा युवक शनिवारी सायंकाळच्यासुमारास शिंदेगावाकडून नायगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या मालट्रकने (एमएच १५ जेसी ५६६१) दुचाकीस धडक दिली होती. हा अपघात वंदन स्विट दुकानासमोर झाला होता. या अपघातात भुषण गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार पुंडलिक ठेपणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
दुस-या अपघातामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील राणेनगर ब्रीज वर रविवारी (दि.१२) सकाळी ५५ ते ६० वयोगटातील महिलेचा मृतदेह मिळून आला. मुंबईकडून भरधाव येणा-या अज्ञात वाहनाने तिला धडक दिल्याचा अंदाज असून सदर महिला फिरस्ती असल्याचे कळते. याबाबत पोलिस नाईक कमलेश आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.
तिसरा अपघात अंबड गावात झाला. आशा संपत गांगुर्डे (६१ रा.नायगाव ठाणे) या वृध्दा गेल्या बुधवारी (दि.८) धावत्या दुचाकीवरून पडल्या होत्या. सातपूर कडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने त्या आपल्या मामाच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. अंबड गावातील स्पिड ब्रेकरर भरधाव दुचाकी घसरल्याने मामा भाची गंभीर जखमी झाले होते. या घटने आशा गांगुर्डे यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने परिसरातील वक्रतुंड हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून शुक्रवारी अधिक उपचारार्थ गोविंदनगर येथील अॅपेक्स वेलनेस रूग्णालयात हलविले असता रविवारी (दि.१२) उपचार सुरू असतांना डॉ.सचिन पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत अबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.