इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः लोकसभेच्या मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केल्यानंतर आता गोदामामधील सीसीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने मात्र तांत्रिक कारणास्तव हे कॅमेरे बंद होते, असे समर्थन केले.
खाबिया म्हणाले, की ज्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवले आहे, त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहेत. त्यात काही षडयंत्र आहे. संबंधित विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. गोदामामध्ये तंत्रज्ञ उपलब्ध नाही. आमच्या लोकांना गोदाम दाखवले जात नाही. पोलिसही आम्हाला काहीच सूचना नाही असे सांगून टोलवाटोलवी करतात. हे नेमके काय सुरू आहे?’ असा सवाल खाबिया यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ज्या गोदामात ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद होते. ही बाब संशयास्पद आहे. हा खूप मोठा हलगर्जीपणा आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. इथे तंत्रज्ञ उपलब्ध नाही. आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी करू दिली जात नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही का बंद पडला याची कारणे जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.