नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अखेर पतीसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
सोनू सुनिल वाघ, रंजना सुनील वाघ (रा.दोघे आदित्यनाथ सोसा.गॅस गोडावूनजवळ पेठरोड ) व राजू सुर्यवंशी (रा.विखरन जि.जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रामदास बाबुलाल मोरे (रा.टिटवी ता.पारोळा जि.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कोमल सोनू वाघ (२३ रा.आदित्यनाथ सोसा.पेठरोड) या विवाहीतेने शनिवारी (दि.११) आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता.
त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत वडिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माहेरून सदनिका घेण्यासाठी दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी मुलगी कोमलचा गेल्या वर्षभरापासून छळ सुरू होता. पती व सासू कडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याने तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.