इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ प्रसारित झाला असून, त्याची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केली आहे. तर आमदार रोहित पवार यांनी ‘उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात… अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील! असे म्हटले आहे.
या सर्व प्रकाराबाबत लंके म्हणाले, की निवडणूक सुरू झाल्यापासून प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना मिळालेल्या पैशाची पाकिटे मला आणून दिली आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये विखे परिवाराच्या पैशांचा पाऊस पडतो आहे. मी सुरुवातीपासून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे म्हणतो आहे. त्याचा प्रत्यय आता येतो आहे. भाजपच्या तालुकाध्यक्षांना पैसे वाटताना लोकांनी पकडले आहे. त्याच्याकडे आठ-नऊ लाख रुपये निघाले.









