इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी त्यांच्याशी संवाद साधला. नाशिक शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि संघटनांचा यात समावेश होता. त्यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न अडचणी समजून घेतल्या तसेच या अडचणी सोडवण्याबत शासन सकारात्मक राहील अशी ग्वाही दिली. २ वर्षांनी नाशिक शहरात कुंभमेळा आयोजित केला जाणार असून त्याच्या आयोजनात सर्वांना सामील करून घेतले जाईल असे स्पष्ट केले. या भागातील शेतकरी, महिला, व्यापारी, सामाजिक संस्था यांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यात येतील. शहरातील घरपट्टीच्या प्रश्नांबाबत निर्णय घेतला असून निवडणूकीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे यासमयी सांगितले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा ताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सुहास कांदे, मनसेचे अशोक मूर्तडक, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्था व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योजकांशी साधला संवाद
नाशिक जिल्हा हा उद्योग नगरी म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्यात १६ हजार छोटे आणि मोठे उद्योग आहेत. येथील समस्या लवकर सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील महायुतीचे सरकार हे उद्योगस्नेही सरकार आहे. हजारो लोकांच्या हाताला काम देणाऱ्या उद्योजकांना सहजपणे उद्योग करता यावा, अशी आमची भूमिका असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
रविवारी मनोहर लॅान्स येथे आयोजित उद्योजक, बांधकाम व विविध संस्थेच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा संस्थेचे अध्यक्ष ललित बुब, निमा संस्थेचे उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य उद्योजक उपस्थित होते.
शहरात खाजगी जागेत विस्तारित उद्योग पट्टे तयार झाले असून त्याठिकाणी मूलभूत सोयी देण्याचा नक्की प्रयत्न करू, तेथील कचरा उचलणे, स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, मलनिस्सारण होईल याची व्यवस्था करून दिली जाईल असे सांगितले. तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही यासमयी नमूद केले. बघतो करतो असे न म्हणता या सोयीसुविधा तात्काळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही याप्रसंगी स्पष्ट केले. इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब सुरू करणे, नाशिक – पुणे रेल्वेमार्गाला गती देणे, पाडले रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा करणे, अशा सोयी नक्की उपलब्ध करून देऊ असेही यावेळी स्पष्ट केले.
शहरातील पारसी शाळेचा प्रश्न सोडवू, स्थानिक नगर वाचनालयाला सरकारी अनुदान देऊ, गोदा गंगा प्रकल्पाला ११ कोटी दिलेत ते कामही लवकरच सुरू होईल. नाशिक-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगून त्यासाठी आपण महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाल अशी अपेक्षा व्यक्त केली.