इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कळवा येथील सभा लक्षवेधी ठरली.
यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, भाषणात डॉ. श्रीकांत शिंदे हे म्हणाले शिवसेना आणि मनसे ‘फेव्हिकॉल’का जोड आहे, पुढच्या वेळेला आतून लावा, नाहीतर आमची बाजू कायम बाहेरच असे सांगत त्यांनी ठाणे येथील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो, तेंव्हा सगळे जुने दिवस आठवले.. आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसोबत अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेंव्हाच ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांच शहर टँकरचं शहर झालंय.. काँक्रीटचं जंगल झालं आहे हे शहर म्हणजे.
ठाणे जिल्हा हा जगातील एकमेव जिल्हा असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे येत असतील. ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे ७ ते ८ महापालिका आहेत. हे का झालं ? याला कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे… श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना माझं सांगणं आहे की तुम्ही या लोंढ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडा. मेट्रो आणा किंवा अजून काही आणा, काही फरक पडणार नाही. सगळं जैसे थे राहणार. इथला मूळचा करदाता नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित राहणार.
कोणी म्हणतील की हा संकुचित विचार आहे… अजिबात हा संकुचित विचार नाही, इथे अनेक वर्ष गुण्यागोविंद्याने नांदणारे अमराठी लोकं पण आपलेच आहेत. अट फक्त एकच, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. आम्ही जर तुमच्या राज्यात आलो तर तुमची भाषा शिकू, अर्थात आम्ही बाहेरच्या राज्यात येणार नाही असे ही राज ठाकरे म्हणाले.
यावेळी निवडणुकांवर बोलतांना ते म्हणाले की, ही पहिली निवडणूक आहे जिला विषय नाही.. त्यामुळे एकमेकांना घाणेरड्या शिव्या देणं इतकंच सुरु आहे. बरं, एकीकडे काय रडारड सुरु आहे, ‘वडील चोरले’. मी फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन कधीच करणार नाही. आज तुम्ही आघाडी करून जे बसला आहात त्याकडे आधी बघा. माझे ७ पैकी ६ नगरसेवक यांनी खोके देऊन फोडले, अरे चोरले कशाला, मागितले असते तर देऊन टाकले असते.
ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी फोडला, काँग्रेस, १९७८ ला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेंव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते, तेंव्हा का नाही काही बोलले.. बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहे असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेंव्हा लाज नाही वाटली.. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्या छगन भुजबळांच्यासोबत मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली? का नाही तेंव्हा विरोध केला?
२०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली, पण निकालांनंतर जेंव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपच सरकार बसणार नाही, तेंव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं, मग ते आधीच का नाही सांगितलं? आणि विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस जेंव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून सांगत होते, तेंव्हा का नाही विरोध केलात? बरं, समजा जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर त्यांनी विरोध केला असता का? आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झाला आहे, कोण कुठे आहे हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत.
मी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा लपूनछपून काही नाही केलं. मी बाळासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगून आलो की पक्ष सोडतोय. त्यांनी मला मिठी मारली आणि विचारलं काय करणार आहेस, मी म्हणलं अजून काही ठरलं नाहीये.. पण एक गोष्ट मनात होती की सन्माननीय बाळासाहेब सोडून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाही. पक्ष काढेन, कितीही अडचणी येऊ देत, चढउतार येऊ दे माझा पक्ष मी चालवणार.