इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज होणार असलेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज आहे. या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील (9 राज्ये + 1 केंद्रशासित प्रदेश) 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. बरोबरीने एकाचवेळी आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा आणि ओदिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही या टप्प्यात मतदान होणार आहे. तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघांतील काही विधानसभा क्षेत्रातल्या मतदानाची वेळ(सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत), मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोगाने वाढवली आहे. महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग-आयएमडीच्या अंदाजानुसार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसून चिंतेचे कारण नाही. चौथ्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी (±2 अंश) तापमानाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे.मात्र, मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर पाणी, शामियाना, पंखे आदी सुविधांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याचेही बोलले जात आहे.
सध्या, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत, 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 283 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे. सर्व टप्प्यांची मिळून एकत्रित मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.