इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या (ता. १३) मतदान होणार आहे. या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८, महाराष्ट्रातील ११, ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८, जम्मू-काश्मीरमधील १ जागांचा समावेश आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील खा. सुजय विखे-नीलेश लंके, पुणे लोकसभा मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ-रवींद्र धंगेकर, बीड लोकसभा मतदारसंघातील पंकजा मुंडे-बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मंत्री संदीपान भुमरे-खा. इम्तियाज जलील-चंद्रकांत खैरे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील डॉ. अमोल कोल्हे-शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघातील श्रीरंग बारणे-संजोग वाघिरे, जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्मिता वाघ-करण पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघातील रक्षा खडसे-श्रीराम पाटील यांच्यात उद्या लढत होत आहे. जागा चौथ्या टप्प्यात एकूण १७१७ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.