इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताः काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या या निवडणुकीत शहजाद्याच्या वयापेक्षा कमी जागा मिळतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची खिल्ली उडवली. आपण असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत धर्मावर आधारित आरक्षण मिळू देणारन नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालला बाँब बनवण्याचा कुटीरोद्योग केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये होते. येथे त्यांनी बराकपूर लोकसभा मतदारसंघ आणि हुगळी लोकसभा मतदारसंघातील सभांना संबोधित केले. ते म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये २०१९ च्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळेल. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याचा कुटीरोद्योग केला आहे. तृणमूल काँग्रेस सरकार लोकांना रामाचे नाव घेण्यास मनाई करते आणि रामनवमी साजरी करू देत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदू दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनले आहेत. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही.
संदेशखळीच्या दोषींना वाचवण्यासाठी तृणमूल काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. संदेशखळीच्या महिला आंदोलकांना तृणमूल काँग्रेसचे गुंड धमकावत आहेत. तृणमूल काँग्रेसने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले, अशी टीका करून मोदी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातील कामगिरीच्या आधारे मी असे म्हणू शकतो, की राष्ट्रीय लोकशाही आघाडी चारशे जागांचा आकडा पार करेल. मला या देशातील लोकांसाठी ‘विकसित भारत’ हवा आहे.