इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा. अमोल कोल्हे यांनी मतदारांना भावनिक पत्र लिहले आहे. हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांची कास सोडणार नाही, स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, ग्रामीण, निमशहरी, शहरी प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून गरज राहीन. लहान लेकराला आई-बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला उंच दिसतं, तसंच तुम्ही पुन्हा मला खांद्यावर उचलून घेऊन संसदेत पाठवाल हा मला विश्वास आहे असे म्हटले आहे.
हे पत्र सविस्तर वाचा…..
जय शिवराय !
२०१९ साली आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आणि माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण देशाच्या लोकसभेत पोहोचला. लोकसभेचा सदस्य म्हणून कायमच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, तरुण यांचा आवाज बनून संसदेत गरजताना आपण सर्वांनी मला पाहिलं, कौतुकही केलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, राजकीय अनुभव नसताना पहिल्याच टर्ममध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार, पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला तो आपण दाखवलेल्या विश्वासामुळेच !
दोन वर्षे कोविडच्या संकटात अनेक मर्यादा आल्या तरीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी Comprehensive Mobility चा विचार करून NHAI च्या माध्यमातून पुणे-नाशिक हायवेवर सुरू केलेले ६ बायपास तर आहेतच, पण त्याचबरोबर तब्बल १९,५०० कोटी रुपयांच्या पुणे-नाशिक, पुणे-नगर व तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गांवरील Elevated Corridor ची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वेचा प्रकल्प कॅबिनेट मंजुरीच्या टप्प्यावर नेला आहे. पुणे मेट्रोचा विस्तार वाघोली आणि लोणी काळभोर पर्यंत नेण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी मेडिसिटी, राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प, भक्ती-शक्ती कॉरिडॉर अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू आहे.
मधल्या काळात ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्यावेळी मनात विचार आला की राजकारणात तत्त्व, मूल्य, निष्ठा या शब्दांना काही किंमत उरेल का ? जर आपणही स्वार्थासाठी, केवळ राजकीय फायद्यासाठी निर्णय घेतला तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे मायबाप जनतेनं अलोट प्रेम दिलं, त्या छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार उरेल का ? काय आदर्श उरेल ? आणि मी निर्णय घेतला निष्ठा, प्रामाणिकपणा व स्वाभिमान या वाटेवर चालण्याचा तो केवळ तुम्हा सर्वांवर विश्वास ठेवून !
आज विरोधकांकडून धादांत खोटा अपप्रचार केला जात आहे, मोठमोठे नेते आव्हान देत आहेत, माझा राजकीय पिंड नाही असं सांगितलं जात आहे. मला प्रश्न पडतो की कोणत्याही भ्रष्टाचाराचा डाग माझ्यावर नाही, केवळ आकसापोटी मी कुणालाही त्रास दिला नाही, प्रामाणिकपणे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, मध्यमवर्गीयांचे प्रश्न मी मांडत राहिलो, वर्षानुवर्ष सोडवणूक न झालेल्या प्रश्नांना मुळापासून सोडवण्यासाठी प्रयत्न केला, संविधानाच्या, लोकशाहीच्या बाजूने ठाम राहिलो, स्वाभिमानाचा सौदा केला नाही, म्हणजे माझा राजकीय पिंड नाही का ?
मला तुम्हा मायबाप मतदारांच्या सद्सदविवेकबुध्दीवर विश्वास आहे, या महाराष्ट्राच्या संघर्षाच्या संस्कारावर विश्वास आहे ! स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या नाही, तर स्वाभिमानासाठी, संविधानासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या बाजूने मी उभा आहे याचा मला अभिमान आहे !
माझी आपल्याला विनंती आहे की “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटण दाबून आपण मतांचा आशीर्वाद द्यावा, मी शब्द देतो की, छत्रपती शिवरायांच्या विचारांची कास सोडणार नाही, स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, ग्रामीण, निमशहरी, शहरी प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून गरज राहीन. लहान लेकराला आई-बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला उंच दिसतं, तसंच तुम्ही पुन्हा मला खांद्यावर उचलून घेऊन संसदेत पाठवाल हा मला विश्वास आहे.
जय शिवराय !