पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिरूरमध्ये एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशोक पवार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद दिल्यामुळे ते अजित पवार गटात गेले नाहीत. यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार यांनी आपल्या गावरान शैलीत “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”, असा धमकीवजा इशारा दिला. त्यानंतर शनिवारी आमदार रोहित पवार थेट या आमदाराच्या घरीच गेले व त्यांना धीर दिला.
या भेटीचे फोटो व पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केली आहे. त्यात म्हटले आहे, अजितदादा धमकी देतात, कसा निवडून येतो तेच पाहतो! आम्ही म्हणतो, स्वाभिमानी जनता आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ असल्याने कसे निवडून येत नाहीत हेच आम्ही पाहतो! आणि हेच ते निष्ठावंत आमदार अशोक बापू पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ बैठकीला रवाना झालो!