इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः रोहिणी खडसे या जरी शरद पवार यांच्या पक्षाचा प्रचार करत असतील, तर त्या लग्न होऊन आमच्या घरातून निघून गेल्या आहेत. त्यांचे आणि आमचे कुटुंब वेगळे आहे. माझी मुलगी आहे, म्हणून नाव लावून काम करते. निवडणुकीनंतर आम्ही एकाच घरात, एकाच कार्यक्रमात-समारंभात वावरताना दिसू. राजकारणामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ नये, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
जळगाव लोकसभा मतदार संघात सुन रक्षा खडसे भाजपच्या तिकीटावर उभे असतांना ननंद असलेल्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार करत असल्यामुळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माझ्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चा या केवळ निवडणुकी पुरत्या नाहीत. निवडणुका संपल्यावर माझा पक्ष प्रवेश होईल असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे व पवार यांना दिलेल्या ऑफरबाबतही खडसे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, की राज्यात आणि देशात मोदींना अँटी इन्कम्बसीला तोंड द्यावे लागत आहे. मात्र असे असले, तरी त्या मोदी यांची सत्ता येईल. देशभरात जनतेला मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटते. शरद पवार आणि मोदी यांची वक्तव्ये परस्पर विरोधाभासी आहे.मात्र मोदी यांना वेगळ्या अर्थाने ठाकरे आणि पवार यांना सल्ला हवा असेल. कदाचित सरकार बनविण्यासाठी त्यांची मदत ही घ्यावी लागू शकते.