नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात किरकोळ वादातून चार जणांच्या टोळक्याने २६ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज मोहम्मद शेख,संजय गणेश प्रधान व त्यांचे दोन साथीदार अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत निळकंठ माथे (रा.जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर) या वृध्दाने याप्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेत माथे यांचा मुलगा रितेश माथे हा युवक जखमी झाला आहे. रितेश माथे गुरूवारी (दि.९) परिसरातील महात्मा गांधी गार्डन भागात गेला असता ही घटना घडली.
गार्डनच्या भितीजवळ उभे असलेले संशयित माथे याच्याकडे बघून शिवीगाळ करीत होते. त्यामुळे तो का शिवीगाळ करतात याबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता संशयित टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत रितेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.