नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शरिरसंबध ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या चारित्र्याविषयी बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रियकराने नातेवाईकांना अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठविल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदाम पाटोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रियकराचे नाव आहे. याबाबत पेठरोडवरील समर्थ नगर भागात राहणा-या युवतीने तक्रार दाखल केली आहे. पीडितेचे गेल्या वर्षभरापासून संशयिताशी प्रेमप्रकरण सुरू आहे. याकाळात तरूणाने वेळोवेळी शरिरसंबध ठेवण्याची मागणी केली मात्र मुलीने त्यास नकार दिल्याने ही घटना घडली.
या प्रेमप्रकरणात संशयिताने मुलीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले होते. विनवण्या करूनही युवती शरिर संबध ठेवण्यास नकार देत असल्याने संतप्त संशयिताने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी (दि.१०) रात्री मुलीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून पीडितेने तात्काळ पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत.