इंडिया दर्पण वृत्तसेवा
मराठा आरक्षणाची धग आता मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या येवला – लासलगाव विधानसभा मतदार संघात सुद्दा बसायला लागली आहे. त्यांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी आता राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देतांना त्यांनी आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
.
लासलगांव येथे शुक्रवारी रात्री त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच लासलगाव ग्रामपंचायत सरपंच व राष्ट्रवादीचे नेते जयदत्त होळकर हे मोठे नेते आहेत. पण, त्यांच्या राजीनाम्यामुळे भुजबळांना मोठा धक्का मानला जातो.
त्यांनी घोषणा करतांना राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा जाहीर केला. मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहे, गेल्या आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी येवला येथे सभा घेतली. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त असून कोणताही राजकीय हस्तक्षेप त्यांना नको असल्याने एक मराठा लाख मराठा या आमच्या बांधवांसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे .