इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती लोकसभा मतदार संघात मतदानाच्या एक दिवस अगोदर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (PDCC) वेल्हे शाखा रात्री सुरु होती. त्यावेळेस आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले होते की, घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे १२ वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा. निवडणूक आयोग दिसतंय ना? सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल असे म्हटले होते. या पोस्टमध्ये व्हिडिओ सुध्दा होता. आता या घटनेची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून मॅनेजर विनायक ज्ञानोबा तोलवडे यांना निलंबित केले आहे.
या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे. मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले. या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे… तसंच त्या रात्रीचं #CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे.
बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी.