नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकची माती गद्दारांना थारा देत नाही, हेमंत गोडसे हे तिसऱ्या नंबरवर राहतील असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विजय करंजकर यांच्या प्रवेशाबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, तिकीट दिले नाही म्हणून पक्ष सोडला. विधानपरिषदसाठी आमदार म्हणून त्यांचे नाव दिले त्यावेळी देखील त्यांना विचारलं नव्हते. विधानपरिषदसाठी त्यांचं नाव देणं हे चूक होती असे आता म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नाशिकमध्ये ८०० ते ९०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाला आहे. १४ तारखेला मी यावर कागदपत्र सादर करून मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तडीपार नोटीसवर बोलतांना ते म्हणाले की, ४ जूनला पाहू कोण हद्दपार होत आहे ते, आता ते माझ्याबाजूला उभे आहेत ते तुमच्यासारखे पळपुटे नाहीत असे सांगत शिंदे गटाला टोला लगावला.
यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जामीन देताना कोर्टाने ईडीला फटकारले, ते आता प्रचारात सहभागी होत आहेत. काल रात्री स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे. १७ मेला सांगता सभेत अरविंद केजरीवाल येणार आहेत त्यांनी आमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
राज ठाकरे यांच्यावर बोलतांना त्यांनी काही नेते आणि पक्षांची दखल घ्यावी असे वाटत नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे
राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेली बरी. अशा कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यासोबत आहेत हे दुर्दैवी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या सभेबाबत प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात ते सभा घेत आहेत, नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी यांच काही फायदा होत नाही. राज्यात आम्ही ३५ ते ४० जागा आम्ही जिंकू. मोदी यांनी मुंबईत पेडर रोडवर घर भाड्याने घ्यावे आम्ही त्यांच्यासाठी घर पाहतो.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनानी चिमटा काढला, त्यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी मोदींचा भाषण ऐकावे. मोदी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिक उपचाराची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.