पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात, अशी त्यांची कार्यपद्धती राहिली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. आज या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी राजकारणामध्ये बालबुद्धी असलेले अनेक लोक असतात. बालबुद्धीने बोलणाऱ्या अशा लोकांकडे काय लक्ष द्यायचे?, असा सवाल त्यांनी केला.
शिरूरमध्ये एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशोक पवार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद दिल्यामुळे ते अजित पवार गटात गेले नाहीत. यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार यांनी आपल्या गावरान शैलीत “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”, असा धमकीवजा इशारा दिला. यावरही पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, “लोकांच्या मतदानाचा अधिकार सरकारचा प्रतिनिधी स्वतःकडे घेत असेल, तर यावर आता काय बोलणार? मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर काही पथ्य पाळण्याची जबाबदारी असते. त्यांची (अजित पवार) भाषा या चौकटीत बसणारी नाही. याबाबत आता जनतेनेच काय निर्णय घ्यायचा हे ठरवावे.”