नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या ५६ वर्षीय महिलेसह एका तरूणाने गुरूवारी (दि.९) आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविता संजयराव देशमुख (रा.संभाजीरोड देवळाली गाव) या महिलेने गुरूवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छतास नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा अभिषेक देशमुख याने त्यांना तातडीने बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी वैदयकीय सुत्रांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
दुसरी घटना एकलहरारोडवरील रेल्वेट्रॅक्शन भागात घडली. मयुर उर्फ सोनू रविंद अहिरे (२९ रा.एकलहरारोड संभाजीनगर) या युवकाने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या पत्र्याच्या खोलीत अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत कुमार बर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई सिडकोतील बंदावणेनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी (रा.अभिनव रो हाऊस,बंदावणेनगर पवननगर पाण्याच्या टाकीमागे सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. मॉण्टी दळवी याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.९) रात्री तो आपल्या घरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीसांनी ही कारवाई केली. पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले असून याबाबत अंमलदार तुषार मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.