नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वीज कंपनीच्या स्वारबाबा नगर येथील उपकेंद्रातून चोरट्यांनी सुमारे ३३ हजार रूपये किमतीचे ट्रान्सफामर्र चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपकार्यकारी अभियंता प्राजक्ता घुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वीज कंपनीच्या स्वारबाबानगर येथील जुन्या उपकेंद्रात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी ३३ केव्ही स्विचयार्ड मध्ये ठेवलेले सुमारे ३३ हजार २०४ रूपये किमतीचे दोन रिपीयर्ड सिटी (करंट ट्रान्सफार्मर) चोरून नेले. अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.
विहीरीवरील मोटारीसह केबल आणि पाईप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विहीरीवरील मोटारीसह केबल आणि पाईप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. छावणी परिषदेच्या कॅथे कॉलनी भागातील विहीर परिसरात हा प्रकार घडला असून चोरट्यांनी सुमारे २० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल क्षेत्रीय (रा.संसरी,दे.कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. क्षेत्रीय छावणी परिषदेच्या वॉटर सप्लाय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. छावणी परिषद कार्यालयाच्या वतीने फायर ब्रिगेडची वाहणे आणि नागरीकांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने कॅथे कॉलनीतील जीएलआर नं. १३४ या ठिकाणच्या विहीरीवर इलेक्ट्रीक मोटार बसविण्यात आली होती. गेल्या २४ एप्रिल रोजी भामट्यांनी या विहीरीवर बसविण्यात आलेली मोटार,केबल आणि पाईपलाईन असा सुमारे २० हजाराचे ऐवज चोरून नेला. अधिक हवालदार आडके करीत आहेत.