मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील एका दुकानात आज (10 मे 2024) भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या छाप्दयारम्यान, बीआयएस मानक चिन्हाशिवाय इलेक्ट्रॉनिक उत्पादने विकली जात असल्याचे आढळून आले. डोंबिवली पूर्वेमधील एमआयडीसी फेज 2 येथे असलेल्या मेसर्स लाइटियम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर ल्युमिनियर्स (फ्लडलाइट्स आणि स्ट्रीट लाईट) आणि बाह्य पॅकेजसाठी मार्किंग स्टिकर्स सापडले. या आस्थापनेतील भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 17 चे उल्लंघन करणाऱ्या या वस्तू भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा-II पथकाने जप्त केल्या आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांना गुणवत्ता नियंत्रण आदेश, 2020 चे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी त्यानुसार त्वरीत कारवाई केली.
बीआयएस कायद्याच्या कलम 17 चे उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान रु. 2,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. या प्रकरणी न्यायालयात कायदेशीर खटला दाखल करण्याची कार्यवाही केली जात आहे.
सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी पाहण्यासाठी बीआयएस केअर ॲप ( अँड्रॉइड मोबाईल आणि आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन केले जाते. ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय चिन्हाची वास्तविकता तपासण्याची विनंती देखील ग्राहकांना केली जाते. यासाठी ग्राहकांनी भारतीय मानक ब्युरोच्या www.bis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणपत्राशिवाय अनिवार्य उत्पादने विकली जात असल्यास किंवा कोणत्याही उत्पादनावर ISI चिन्हाचा गैरवापर होत असल्यास, ब्युरोच्या कार्यालयाला याची माहिती द्यावी, असे ब्युरोने वारंवार जाहीर केले आहे. मुंबईत अशा घटनांची तक्रार हेड, MUBO-II, वेस्टर्न रिजनल ऑफिस, भारतीय मानक ब्युरो, 5वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई – 400076 या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा hmubo2@bis.gov.in या ई-मेलद्वारे देखील केली जाऊ शकते. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल, असे शास्त्रज्ञ – एफ/वरिष्ठ संचालक आणि मुंबई शाखा कार्यालय-II चे प्रमुख संजय विज यांनी सांगितले आहे.