दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांची भूमिका महायुती साठी अत्यंत महत्वाची असून मंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात धुसफूस सुरू असतानाच आज दिंडोरी तालुक्यात दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे अचानक महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत व्यासपीठावर दिसल्याचा फोटो व्हायरल झाल्याने झिरवाळ शरद पवार गटाच्या वाटेवर अशी चर्चा सुरू झाल्याने राज्यात महायुतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान नरहरी झिरवाळ हे धार्मिक कार्यक्रमासाठी तिसगाव येथे आले असताना ग्रामस्थांच्या आग्रहाने व्यासपीठावर गेले मात्र त्यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य केले नसून ग्रामस्थांसह सर्वच उपस्थित नेत्यांनी या घटनेचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये असे सांगितले मात्र दिवसभर या घटनेच्या उलटसुलट चर्चेने राजकीय गोटात खळबळ उडाली. आमदार झिरवाळ यांनीही आपण महायुती सोबतच असून डॉ. भारती पवार यांच्या प्रचारात सक्रिय असून आज तिसगाव येथे ग्रामस्थांच्या आमंत्रण नुसार धार्मिक कार्यक्रमासाठी गेलो असता तेथे आकस्मित भेट झाली कोणतीही राजकीय चर्चा नाही त्याचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये असे झिरवाळ यांनी सांगितले.
मी लोकांत बसतो – नरहरी झिरवाळ
दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीत करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत अक्षय तृतीया चे मुहूर्तावर भूमिपूजन होणार होते. या कार्यक्रमासाठी सकाळी दहा वाजता झिरवाळ हे मारुती मंदिर येथे आले.त्यावेळी महा विकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची प्रचार सभा सुरू होती त्यावेळी भगरे बोलत होते. झिरवाळ गाडीतून उतरताच त्यांनी सर्वांना नमस्कार केला व आपण मंदिर कार्यक्रमासाठी आल्याचे सांगितले त्यावेळी उपस्थितांनी सभा संपत आहे या सांगितले यावेळी झिरवाळ यांनी मी ग्रामस्थांमध्ये बसतो सांगितले परंतु ग्रामस्थ व नेत्यांनी त्यांना व्यासपीठावर येण्यास सांगत तुम्हाला अडचणीत आणणार नाही बसा सांगितले.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे हे ही उपस्थित होते. प्रचार बैठक आटोपत मंदिर कामावर चर्चा झाली व प्रचारक दुसऱ्या गावाला मार्गस्थ झाले त्यानंतर येथील मंदिर कामाचे शुभारंभ भूमिपूजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अजित दादा व महायुती सोबतच – नरहरी झिरवाळ
आपण ग्रामस्थांचे आग्रहास्तव तिसगाव येथे मारूती मंदिर जीर्णोद्धार काम शुभारंभ सोहळ्यास आलो होतो त्यावेळी महाविकास आघाडीची सभा आटोपत आली होती ग्रामस्थांनी आग्रह करत आपल्याला तेथे बसायला सांगितले कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही मंदिर कामा संदर्भात चर्चा झाली मी काल महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या वणी दौऱ्यात होतो व यापुढेही त्यांचे प्रचारात असणार आहे व्हायरल झालेली पोस्ट मध्ये कोणतेही तथ्य नाही मी अजित दादा यांचे सोबतच असून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहणार.