जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात सभेवर सभा होत असतांना मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. मराठा एकत्र आल्याने मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला आहे. मराठा ताकदीने एकत्र आल्याची देशाने धास्ती घेतली. एकीची भीतीपुढे चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत असेही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांचे राज्यभर दौरे सुरू केले आहेत. मराठा आरक्षणामुळेच मोदी यांना महाराष्ट्रात वारंवार यावे लागते असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिला.
यावेळी ते म्हणाल की, मराठा एक झाला म्हणून राज्यात अनेक टप्प्यांत निवडणूक घ्यावी लागली. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. या लोकसभा निवडणुकीत असे पाडा, की पाच पिढ्या घरी बसले पाहिजेत, या विधानाचा पुनरुच्चार करून जरांगे पाटील म्हणाले, की माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला, तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे. जात महत्वाची आहे. आपल्यासोबत न आलेल्यांना जिल्हा परिषद, सरपंचपदाला पाडा. मराठ्यांच्या विरोधात गेल्यास परिणाम भोगावे लागतील. मराठा कुणबी कायदा केला नाही, तर विधानसभेला बघतो, असा इशारा त्यांनी दिला.