पं डॅा. श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी
ज्योतिषशास्त्र अभ्यासक.येवला जि.नाशिक
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आश्विन पौर्णिमेला म्हणजेच २८ आणि २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री संपूर्ण भारतभर खंडग्रासच्या रुपात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल आणि अर्धरात्रौ २ वाजून २४ मिनिटापर्यंत चालेल. हे चंद्रग्रहण भारतातील विविध शहरांमध्ये दिसणार आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. याला आंशिक चंद्रग्रहण असेही म्हणतात. हे खंडग्रास चंद्रग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात लागेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरू होतो. तसेच, सुतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. दिनांक २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ ता.२८ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी सुरू होणार आहे.भारतासह इतर देशातही चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण एशिया, यूरोप, अफ्रीका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकाच्या उत्तर पूर्व क्षेत्रात, हिंद महासागर, दक्षिणी प्रशांत महासागर या सर्व ठिकाणी दिसणार आहे.हे चंद्रग्रहण २०२३ सालातील दुसरे आणि शेवटचे ग्रहण असेल!
चंद्रग्रहणातील वेधचे काही नियम
ग्रहण आणि वेध काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा, ग्रहणाचा नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो;असे विविध ग्रंथातील दाखले प्रसिद्ध आहेत. त्यामुळे यावेळी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, धारदार वस्तूंचा वापर करू नये, मंत्रोच्चार करावा आणि सोबत नारळ ठेवावा. वेध दरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये असा धर्मसंकेत आहे . दूध, पाणी, दही इत्यादी गोष्टींमध्ये तुळशीची पाने टाका. यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता. वेध लावण्यापूर्वी तुळशीची पाने नम्रपणे खुडून घ्या. कारण वेध लागल्याबरोबर तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा तिची पूजा करू नका. सुतक काळात देवाची पूजाही करू नये. त्यामुळे पूजेच्या खोलीत पडदे लावा आणि ग्रहण संपल्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडा.ज्योतिष शास्त्रानुसार, हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण देखील खास आहे कारण राहु केतू देखील ऑक्टोबरमध्ये आपली स्थिती बदलणार आहे. यामुळे अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.
या राशीच्या लोकांवर संमिश्र परिणाम
मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अशुभ सिद्ध होणार आहे. या लोकांनी सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते. शत्रूंमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. या काळात आरोग्याचीही समस्या उद्धभवणार आहे. राजकीय उलथापालथ होतील.जगभरात युद्ध यामुळे तणावात वाढ संभवते. तर कुंभ, मकर, मिथुन, तूळ, वृश्चिक, सिंह, धनु आणि मिथुन या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती, कामाच्या ठिकाणी सन्मान आणि अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तर कन्या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम दिसून येणार आहे.
गंगेत स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे
चंद्रग्रहणानंतर गंगेत स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चंद्रग्रहणानंतर जर एखाद्या व्यक्तीने गंगेत स्नान केले आणि नंतर भगवान विष्णूची पूजा केली तर त्याला दानापेक्षा अनेक पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते आणि ग्रहणामुळे होणार्या दुष्टांपासून मुक्ती मिळते. जर तुम्ही गंगेच्या काठावर पोहोचू शकत नसाल तर चंद्रग्रहणानंतर तुम्ही इतर कोणत्याही जल तीर्थस्थानी जाऊन या पुण्यचा लाभ घेऊ शकता किंवा तुमच्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. चंद्रग्रहणानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे.
दोष टाळण्यासाठी काही नियम
चंद्रग्रहणाचा दोष टाळण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी हे नियम पाळावेत. धर्मशास्त्रीय ग्रंथातील आधारे असा उपदेश केला आहे की; गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण काळात चंद्रग्रहण पाहू नये. त्याचप्रमाणे या काळात प्रवास टाळावा. चंद्रग्रहणाच्या वेळी देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये आणि त्यांची पूजा करू नये, पण गुरूंनी दिलेला आपण यावेळी मंत्रांचा उच्चार करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणामुळे सर्व राशीनुसार प्रभाव असतो. असे मानले जाते की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्राचा मंत्र ‘ॐ सोमाय नमः’ किंवा भगवान शिवाच्या ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप रुद्राक्ष जपमाळाने करावा. असे मानले जाते की मंत्र जपाच्या शुभ प्रभावामुळे चंद्रग्रहणाचे दोष दूर होतात
क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, पैसा इत्यादी दान करावे
दान हे जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर करणारे मानले जाते. अशा स्थितीत चंद्रग्रहणाच्या दिवशी त्यामुळे होणारे अशुभ टाळण्यासाठी विद्वान ब्राह्मण अथवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, पैसा इत्यादी दान करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्यास चंद्रग्रहणाच्या दोषापासून मुक्ती मिळते.