नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील आठ लोकसभा मतदार संघात शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार असल्यामुळे येथे ते कोणाला पाठींबा देतात याबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्यासाठी आज त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण, या पत्रकार परिषदेत त्यांनी या आठ लोकसभा मतदार संघात भक्त परिवाराने सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन भक्त मतदान करावे असे सांगत या विषयावर पडदा टाकला. कोणालाही पाठींबा न देता त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या मतदार संघात शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे. येथील बहुतांश उमेदवारांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्य़ा भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहे.