नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जदार महिलेच्या तक्रारीवरून उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यात घरझडतीत लाखोंच्या बेकायदा व्यवहाराचे घबाड व खरेदी खते पथकाच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
विठ्ठल कचरू रिकामे (रा.विंचूर गवळी पो. माडसांगवी ता.जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सावकाराचे नाव आहे. याबाबत उपनिबंधक कार्यालयाचे (सहकारी संस्था) मुख्य लिपीक मंगेश वैष्णव यांनी फिर्याद दिली आहे. रिकामे याच्या बेकायदी सावकारी विरोधात अनेक तक्रारी उपनिबंधक कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. महिलेकडून मुद्दलसह जास्तीच्या व्याजाची मागणी होत असल्याची तक्रार प्राप्त होताच उपनिबंधक कार्यालयाने दखल घेत ही कारवाई केली. पथकाने संशयिताचे घर गाठून छापा टाकला असता त्याच्या घरात तक्रारदार महिलेच्या वाहनाची कागदपत्र तसेच स्टेट बँकेच्या सिडको शाखेचा रिकामे यांच्या नावे असलेला २ लाख १० रूपयांचा आणि ६५ हजार रूपयांचा धनादेश, १ लाख ५० हजार रकमेची हात उसनवार पावती तसेच अनेक लोकांच्या विसार पावत्या व खरेदी खत आणि साठे खत करारनामे विक्री करारनामा भरणा पावती,जनरल मुक्तार पत्र,साठेखत करारनामा उसनवार पावत्या आढळून आल्या.
संशयिताने बेकायदा सावकारीचा धंदा थाटल्याचे निदर्शनास येताच उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने पोलीसात तक्रार देण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.