नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी अतिशय आनंद व्यक्त केला आहे. काही प्रतिनिधींनी या प्रक्रियेतील पारदर्शकतेची प्रशंसा केली तर इतरांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या हरित मतदान केंद्रासारख्या उपक्रमांना प्रेरणादायी म्हटले आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांचे रॅन्डमायजेशनसह या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या वापराची देखील या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. लोकशाही सिद्धांतांना बळकट करण्यासाठी भारतीय मतदारांचा अढळ विश्वास आणि बांधिलकी यामुळे विशेषत्वाने प्रभावित झाल्याचे देखील काही प्रतिनिधींनी सांगितले.एकंदरितच या देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत एकमत झाले की भारतातील निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, समावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातील आहे आणि एखाद्या उत्सवाच्या भावनेने आयोजित केली जाते.
या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमांतर्गत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर व्यक्त केला.तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 93 मतदारसंघांमध्ये मतदान झाले आणि या प्रतिनिधींनी ६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मनुष्यबळ आणि यंत्रांची ने-आण करण्याच्या निर्विवादपणे जगामध्ये अतिशय गुंतागुंतीच्या आणि व्यापक असलेल्या मतदानाच्या तयारी प्रक्रियेसह मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
बांगलादेश, श्रीलंका, कझाकस्तान आणि झिम्बाब्वेच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील रायगड लोकसभा मतदारसंघाला भेट दिली आणि निवडणुकीपूर्वीची व्यवस्था, मतदान प्रक्रियेतील कर्मचारीवर्गाची तैनाती आणि इतर लॉजिस्टिक्स प्रक्रिया पाहिली. या गटाने जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक अधिकारी, पीठासीन अधिकारी आणि निवडणुकीशी संबंधित इतर अधिकाऱ्यांशी भारतीय निवडणुकांच्या विविध पैलूंबाबत संवाद साधला. मतदान केंद्रामधील मधील पारदर्शकतेच्या उपाययोजनांमुळे प्रतिनिधी प्रभावित झाले.
या २३ देशांचे प्रतिनिधी, विशेषतः ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चिली, फिजी, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिझ, मादागास्कर, मालदीव, मंगोलिया, मोल्डोवा, नामिबिया, नेपाळ, न्यू गिनी, फिलीपिन्स, रशिया, सेशेल्स, श्रीलंका, ट्युनिशिया, उझबेकिस्तान, झिम्बाब्वे या देशांचे प्रतिनिधी ५ मे २०२४ रोजी भारतामधील सार्वत्रिक निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले होते.