नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॅा. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात सनातन संस्थेच्या दोन साधकांना जन्मठेप झाली आहे. सदर संस्था धर्माच्या आडून दहशतवादी कृत्य करते, हे पुन्हा सिध्द झाले आहे. हा निकाल ताबडतोब लागला असता तर पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश हे खून होण्यापासून वाचले असते. मारेकऱ्यांना शिक्षा झाली. पण खुनाचे मुख्य सुत्रधार निर्दोष सुटले. सरकारी पक्ष पुरेसे पुरावे गोळा करण्यास असमर्थ ठरले. खुनाच्या सुत्रधारास शिक्षा झाली असती तर अधिक चांगला न्याय मिळाला असता. तरीही डॅा. दाभोलकरांचे काम जोमाने पुढे नेऊ अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.
दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर तिघांची निर्दोष मुक्तता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने आज अंतिम निकाल दिला. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना ५ लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. तर विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्देोष मुक्तता करण्यात आली. तब्बल ११ वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. पाच जणांवर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप होता. त्यातील दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आज पुण्यातील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयात निकालपत्राचे वाचन करत ही शिक्षा सुनावली.
गोळ्या झाडून हत्या
डॉ. दाभोलकर पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी फिरायला गेले होते. त्या वेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आधी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस आणि नंतर ‘सीबीआय’ कडे सोपविण्यात आला; मात्र दोन्ही यंत्रणांचा तपास चुकीचा ठरल्याने आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोडून द्यावे लागले. कर्नाटकमधील एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना तपासात सनातन संस्थेशी धागेदोरे जोडले जात असल्याचे आढळून आले. कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून दाभोलकरांच्या हत्येचा उलगडा झाला.
असा रचला होता कट
कर्नाटक पोलिसांनी ‘सीबीआय’ माहिती दिल्यानंतर अटकसत्र सुरू झाले. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. तावडे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचला, कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. पुनाळेकरने आरोपींन पळून जाण्यास मदत केली, भावेने हत्येसाठी वापरलेली पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होता. या सर्व प्रकरणावर आज न्यायालयाने निकाल दिला.