नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघात आधीच कांद्याच्या प्रश्नावरून लोकं प्रक्षुब्ध असताना आता या कांदेमुळे म्हणजे दोन दोन कांद्याचा त्रास भारती पवारांना नको आहे असे विधान मंत्री छगन भुजबळांनी केल्यामुळे त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आहे.
मंत्री छगन भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून दिंडोरी लोकसभा मतदार संघातील नांदगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार करत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर भुजबळांनी आरोप फेटाळले. यावेळी त्यांनी सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्या विषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. आधीच कांद्याच्या प्रश्नावरून लोकं प्रक्षुब्ध असताना आता या कांदेमुळे म्हणजे दोन दोन कांद्याचा त्रास भारती पवारांना नको आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने भारती पवारांचे काम करू. तुमच्यामुळे भारती पवारांना मदत होण्यापेक्षा अडचणी निर्माण होत आहेत. आमच्या लोकांना कांदे बरोबर काम करणे शक्य नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरित्या करत आहे. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.
एकुणच या आरोप – प्रत्यारोपात कांद्याचा प्रश्नावर दिंडोरी मतदार संघात शेतक-यांचा राग अद्यापही कमी झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेचे दोन दोन कांद्याचा त्रास भारती पवारांना नको असे विधान भुजबळांनी केले. पण, या भांडणात हे विधानच जास्त चर्चेचे ठरले.