शिरूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक संपल्यानंतर पवार विरुध्द पवार हा वाद शमेल असे वाटत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी शरद पवार यांचा मुलगा असतो, तर मला नक्कीच संधी मिळाली असती; पण केवळ त्यांचा मुलगा नाही, म्हणून डावलले, अशी खदखद व्यक्त केल्यामुळे त्याची चर्चा आता रंगली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. एकीकडे शरद पवार आमचे दैवत आहे, यामध्ये दुमत नाही, असे सांगताना ८० वर्षांनंतर कुठेतरी थांबले पाहिजे, असा सल्ला अजितदादांनी दिला. माझे वयदेखील ६० च्या पुढे गेले आहे. आता किती थांबायचे? असा प्रश्न त्यांनी केला. आम्हाला देखील संधी नको का? असा सवाल करीत अजिततदादा म्हणाले, की भावनिक होऊ नका. पवार साहेब आमचे दैवत आहे; परंतु केवळ मी त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे मला संधी नाही? हा कोणता न्याय? असे प्रश्न अजित पवार यांनी विचारले.
ते म्हणाले, की शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती. मी जिल्हा बँक ताब्यात घेतली. जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पाहा. अनेक लोक आम्हाला निवडून दिल्यानंतर बारामतीसारखा विकास करू, असे म्हणतात, यावरूनच आमच्या बारामतीचा विकासाचा प्रत्यय येतो असेही ते म्हणाले.