इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीचा दैनंदिन कारभारात अडथळा आणण्याबद्दल तसेच नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावली आहे.
‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या शंभरहून अधिक क्रू मेंबर्सनी आजारी असल्याची सबब देत अचानक रजा घेतल्या. त्यामुळे ऐंशीहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी अचानक रजा घेणे म्हणजे, एक प्रकारचा संपच आहे. गेल्या दोन दिवसांत शंभरहून अधिक क्रू मेंबर्स अचानक आजारी रजेवर गेल्यामुळे एअरलाईनला ९० उड्डाणे रद्द करावी लागली.
‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी रजेप्रकरणी तब्बल २५ वरिष्ठ क्रू मेंबर्स टर्मिनेट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने १३ मेपर्यंत ‘एअर इंडिया एक्सप्रेस’कडून कमी उड्डाणे शेड्युल्ड करण्यात येणार आहे. गेल्या मंगळवारी शेवटच्या क्षणी केबिन क्रू सदस्यांनी आजारी असल्याच्या रजा टाकल्या आणि त्यांचे मोबाईल बंद केले. एअरलाइनचे ‘सीईओ’ म्हणाले, की आमच्या शंभरहून अधिक केबिन क्रू सहकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी आजारी पडल्याची नोंद केली. त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शंभरहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. त्याचा फटका १५ हजार प्रवाशांना बसला. एअरलाइनचे ‘सीईओ’ आलोक सिंह म्हणाले, की संपूर्ण नेटवर्क प्रभावित झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये विमानांचे उड्डाण कमी करण्यास भाग पडले आहे.