नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री छगन भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून दिंडोरी लोकसभा मतदार संघातील नांदगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार करत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी कांदे यांचे आरोप फेटाळून लावले आहे.
महायुतीचा धर्म न पाळता नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा विरोधक असलेल्या तुतारी या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. मंत्रिपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र महायुतीचा धर्म न पाळता करायचा. यापेक्षा भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल तुतारीचा प्रचार करावा, अशा शब्दांत कांदे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली. आ. कांदे यांनी अजित पवार यांच्या पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणून बुजून तुतारीचा प्रचार करीत आहेत. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचे आणि तुतारीचे काम महाविकास आघाडीचा प्रचार करायचा असे जमणार नाही, असे ठणकावून मंत्रिपदाचा राजीनामा देत तुतारीचे काम करा, असा सल्ला आ. कांदे यांनी दिला आहे.
आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टीफिकेटची गरज नाही
सुहास कांदे यांच्या आरोपावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कांदे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही महायुतीचे काम करत आहोत. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्या विषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. आधीच कांद्याच्या प्रश्नावरून लोकं प्रक्षुब्ध असताना आता या कांदेमुळे म्हणजे दोन दोन कांद्याचा त्रास भारती पवारांना नको आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने भारती पवारांचे काम करू. तुमच्यामुळे भारती पवारांना मदत होण्यापेक्षा अडचणी निर्माण होत आहेत. आमच्या लोकांना कांदे बरोबर काम करणे शक्य नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरित्या करत आहे. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.