नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका परिसरात वाहन रिव्हर्स घेत असतांना पाठीमागील वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून कारचालकाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमएच ४८ एके ७८६४ या कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्ग भागात राहणा-या ४० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता मंगळवारी (दि.) दुपारच्या सुमारास द्वारका भागात गेल्या होत्या. काशी माळी मंगल कार्यालयाजवळ पार्क केलेली कार त्या पार्किंगमधून काढत असतांना ही घटना घडली.
कारच्या मागेपुढे वाहने असल्याने त्यांनी रिव्हर्स घेण्यासाठी पाठीमागील कारमध्ये बसलेल्या चालकास आपले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने संतप्त चालकाने कारमधून उतरून महिलेस शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.