नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढल्यामुळे नाशिकचे राजकारण चांगलेच तापले आहे. बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे पोलिस आता पुढील कारवाई काय करता याकडे लक्ष लागले आहे.
बडगुजर वरिष्ठ पोलिस अधिका-यांची व वकीलांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेही बोलले जात आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा होता. त्यांचा दौरा संपल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. ठाकरे गटाचे दोन प्रमुख नेत्यांवर लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची मुख्य जबाबदारी होती. त्यातील विजय करंजकर हे शिंदे गटात गेल्यामुळे संपूर्ण जबाबदारी बडगुजर यांच्याकडे आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो.
सलीम कुत्ता प्रकरण
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर डान्स प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबध असल्याचा आरोप आहे. नागपूर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात या पार्टीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर बडगुजर यांच्याविरोधाक कारवाईची मागणी करण्यात आली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.