इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यामुळे महायुतीची चिंता वाढली आहे. महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उशीरा मिळालेली उमेदवारी व त्यातून घडलेले नाट्य यामुळे त्याचा फटका त्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी मते हे पर्याय म्हणून शांतीगिरी महाराजकडे बघत असल्यामुळे गोडसे यांना त्याचा फटका बसणार आहे.
महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी व रिपाइं हे घटक पक्ष एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन अद्यापही झालेले नाही. त्यातच या पक्षांचे समर्थक असलेली मते ही शिवसेना शिंदे गटाला पडेलच असेही नाही. मेळावा, रोड शो यात नेतेही फोटोसाठी एकत्र येत असल्याचे चित्र असले तरी हे नेते कितपत काम करतील याबद्दल साशंकता आहे. विशेष म्हणजे या नेत्यांच्या गर्दीत केडरचे कार्यकर्तेही दुखावले असून ते प्रत्यक्षात प्रचारात फारसे सक्रीय नाही. या सर्वांचा फायदा शांतीगिरी महाराजांना भेटत असल्याचे आता हळूहळू दिसू लागले आहे. शांतीगिरी महाराजांना मिळालेले बादली हे चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय दिसू लागले आहे.
शांतीगिरी महाराजांची ताकद
शांतीगिरी महाराजांची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. त्यातून शांतीगिरी महाराजांची ताकद सर्वांसमोर आली. नाशिकबरोबरच उत्तर महाराष्ट्रात जय बाबाजी भक्त परिवाराजी संख्या मोठी असल्यामुळे महायुतीला चांगलीच धडकी भरली आहे.