नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला गेल्या. याप्रकरणी भद्रकाली, पंचवटी,उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पहिली घटना शिवाजीनगर भागात घडली. घनश्याम बाळू डंबाळे (रा.त्रिमुर्ती चौक सिडको) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. डंबाळे गेल्या २२ एप्रिल रोजी शिवाजीनगर भागात गेले होते. अभिषनगर सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी एमएच १५ एचझेड १६७२ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. दुस-या घटनेत नितीन मधुकर गांगुर्डे (रा.दसकगाव जेलरोड) यांची एमएच १५ एफएक्स ७८५९ मोटारसायकल गेल्या ३० एप्रिल रोजी रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातील नंदिनी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.
तिस-या घटनेत जुने नाशिक भागातील आरीफ इस्माईल पठाण (रा.कथडा) यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू १०२७ गेल्या गुरूवारी (दि.२) रात्री जाकिर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत. चौथी मोटारसायकल चोरीची घटना फुलेनगर भागात घडली. विजय जयवंतराव चव्हाण (रा.धन्वंतरी हॉस्पिटलजवळ,दत्तनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण शनिवारी (दि.४) फुलेनगर येथील शनिमंदिर भागात गेले होते. डॉ. पाटील यांच्या दवाखान्यासमोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ बीएच ९४७४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.
पाचवी घटना गणेशवाडी भागात घडली. सिध्देश अर्जुन शिंदे (रा.अशोकस्तंभ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे गुरूवारी (दि.२) रात्री गणेशवाडी येथील आयुर्वेदीक दवाखान्यात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ एचएस ४८०७ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही गुह्यांबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सानप व शेवाळे करीत आहेत.