पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदात संघात काल मतदान झाले. त्यानंतर या मतदार संघात कोणाचा विजय होईल याचा अंदाज आता बांधला जात आहे. मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गुलाल आपलाच आहे अशी पोस्ट केली.
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, आम्ही आमचे काम केले आहे. मी बारामतीच्या नागरिकांना सांगत होतो की, नागरिकांनी आणि मतदारांनी विरुद्ध बाजूच्या भावनिक आवाहनांना बळी पडू नये आणि त्यांच्यासाठी कोण काम करेल, कोण करू शकेल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. विकासासाठी केंद्रातून निधी आणा आणि या भागातील पाण्याची समस्या कोण सोडवू शकेल…मला वाटते मतदारांनी आमचे ऐकले आहे आणि बारामतीतून आमचा उमेदवार विजयी होईल…
बारमती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदा पवार विरुध्द पवार सामना रंगला. एकमेकांवर दोन्ही बाजूंनी आरोप – प्रत्यारोप झाले. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली. विशेष म्हणजे या निवडणुकीमुळे अनेकांची अडचणही झाली. महायुती विरुध्द महाविकास आघाडी असलेल्या या निवडणुकीत कोणाचा विजय होईल हे सांगणे अवघड आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बारामतीत सर्वाधिक कमी मतदान झाल्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.