इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या ‘ॲस्ट्राझेन्का’ या कंपनीने जगभरातून कोव्हिशिल्ड लशीचा साठा परत मागवण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम झालेली अऩेक उदाहरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये यावरून न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयात कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम झालेल्या रुग्णांची यादी सादर करण्यात आली आहे. त्यापैकी अनेक रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत आहेत. ‘ॲस्ट्राझेन्का’ कंपनीनेही कोविशिल्डमुळे ‘थ्रोम्बोसाइ टोपेनिया सिंड्रोम’ (टीटीएस) होऊ शकतो, रक्तात गुठळ्या तयार होऊ शकतात, याची कबुली न्यायालयात दिली होती. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
जगभरातून कोव्हिशिल्ड लस मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. लशीच्या दुष्परिणामांमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती; परंतु मुळात जागतिक स्तरावर या लशीची मागणी अत्यंत कमी असल्याने ‘ॲस्ट्राझेन्का’ने लस परत मागवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. कोरोना साथीच्या काळात कोव्हिशिल्ड ही जगात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या प्रतिबंधक लशींपैकी एक होती; मात्र आता बाजारपेठेत कोरोनासाठीच्या आणखी प्रगत लशी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे ‘ॲस्ट्राझेन्का’ने कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती आणि वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना काळात परिस्थिती हाताळलेल्या ‘आयसीएमआर’च्या माजी शास्त्रज्ञांनी कोव्हिशिल्ड लशीपासून भारतीयांना कमी धोका असल्याचे म्हटले होते.