नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने २२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना न केल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवत पोलीसांनी याप्रकरणी ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
विरेंद्र पंडीत असे संशयित ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत संकेत सुनिल सांगळे (रा.मुरारीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत हिरामण सिताराम मोंढे (२२ रा.पोकरपाडा – धिवरगाव ता.जि.नाशिक) या मजूराचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.६) दुपारी ही घटना घडली होती. कारगिल चौकात सुरू असलेल्या तुळजा हाईटस या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसवर मृत हिरामन मोंढे,लक्ष्मण दिवे व दिनकर मोंढे हे तीन मजूर मालवाहू क्रेन फिट करीत असतांना हा अपघात झाला होता.
हिरामण मोंढे क्रेनच्या आतमधून नट फिट करत असतांना अचानक तोल गेल्याने क्रेनसह तो जमिनीवर कोसळला होता. जखमी अवस्थेत त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दरम्यान ठेकेदार विरेंद्र पंडीत याने मजूराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न केल्याने हा अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
……..