नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वीस लाखाच्या खंडणीसाठी बापलेकाने एका बिल्डरला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणीखोरांपैकी एक संशयित नुकताच कारागृहातून बाहेर पडल्याचे कळते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुर्यभान गयाजी जाधव व ओम सुर्यभान जाधव (रा.पेठ गल्ली, गंगापूरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बापलेकाचे नाव आहे. याबाबत समिर शामराव केदार (रा.वसंत मार्केट,कॅनडा कॉर्नर) यांनी फिर्याद दिली आहे. केदार यांचा लॅण्ड डेव्हलपींगचा व्यवसाय असून त्यांचे वसंत मार्केट भागात कार्यालय आहे. केदार आणि संशयित यांच्यात खरेदी विक्रीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार असल्याचे बोलले जाते. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे. अन्य गुन्हयात अडकलेला जाधव काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर पडला आहे.
कारागृहाबाहेर पडताच त्याने आपल्या मुलास सोबत घेवून हे कृत्य केले आहे. केदार यांचे वडिल गेल्या २३ एप्रिल रोजी वसंत मार्केट येथील कार्यालयात असतांना संशयित बापलेकाने त्यांना गाठले. यावेळी संशयितांनी २० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच रक्कम पंधरा दिवसाच्या आत न मिळाल्यास तुमच्या मुलास मारून टाकेल अशी धमकी दिल्याने केदार यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास जमादार अनिल उबाळे करीत आहेत.