नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगर भागात आयपीएलच्या हैद्राबाद विरूध्द मुंबई या क्रिकेट सामन्यावर उघड्यावर बसून बेटींग लावणा-याला पोलीसांनी गजाआड केले आहे. संशयिताच्या ताब्यातून मोबाईल, रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे पाच हजार ८५० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय दिनेश नागोड (२८ रा. लोणारी चाळ,मारूती मंदिराजवळ,क्रांतीनगर) असे संशयिताचे नाव आहे. अंमलदार नितीनकुमार पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मखमलाबादरोडवरील क्रांतीनगर बस थांबा भागातील बंद गाळयांच्या बाहेरील मोकळया जागी बसून एक तरूण सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२० च्या हैद्राबाद विरूध्द मुंबई या क्रिकेट सामन्यावर बेटींग लावित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी (दि.६) रात्री पोलीसांनी धाव घेतली असता संशयित उघड्यावर बसून मोबाईलच्या माध्यमातून सामन्याचे थेट प्रेक्षपण बघत बेटींग लावतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून मोबाईल रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ५ हजार ८५० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार गुंबाडे करीत आहेत.