इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : वैमानिक सामूहिक रजेवर गेल्यामुळे ७८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. आजारपणाचे कारण देत ‘एअर इंडिया एक्सप्रेस’चे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहे. ‘एअर इंडिया’ आणि ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चे विलिनीकरण झाल्यास नोकरी धोक्यात येईल अशी भावना असल्यामुळे सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. परिणामी ७८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.
‘एअर इंडिया एक्सप्रेस’ गेल्या काही काळापासून केबिन क्रूच्या कमतरतेचा सामना करत आहे. अनेक कर्मचारी टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीवर कथित गैरव्यवस्थापनाचा आरोप करत आहेत. ‘एअर इंडिया’मध्ये ‘एक्स कनेक्ट’ (पूर्वीचे एअर एशिया इंडिया) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही समस्या आणखी वाढली आहे. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, जे ‘एअर इंडिया’च्या विमानाने प्रवास करणार आहेत, त्यांनी चौकशी करूनच विमानतळावर यावे, असे आवाहन ‘एअर इंडिया’ ने केले आहे.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करत आहे. ‘एअरलाईन’ ने म्हटले आहे, की ज्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे, त्या सर्व प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल किंवा त्यांचे फ्लाईट दुसऱ्या तारखेला रिशेड्यूल करण्याचा पर्याय असेल असे म्हटले आहे.