नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सारडा सर्कल भागात मोटारसायकल खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने ट्रायलचा बहाणा करून लाखाची दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली. दहा – अकरा दिवस उलटूनही भामटा दुचाकी घेवून न परतल्याने दुचाकी विक्रेत्याने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज शौकत शहा (रा.अशोका मार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. शहा यांचा सारडा सर्कल भागात न्यु संर्जरी वाहन बाजार नावाचा व्यवसाय आहे. या ठिकाणी दुचाकी खरेदी विक्री केली जाते. गेल्या २७ एप्रिल रोजी या ठिकाणी अनोळखी ग्राहक आला होता. ग्राहकाने वाहन बाजारात विक्रीसाठी पार्क करण्यात आलेली सुमारे एक लाख रूपये किमतीची एमएच १५ जेई ५६२२ या केटीएम स्पोर्टस बाईक खरेदीची तयारी दर्शविली.
त्यामुळे त्याच्या ताब्यात ट्रायलसाठी दुचाकी दिली असता ही घटना घडली. ट्रायलसाठी दुचाकी घेवून गेलेला अनोळखी तरूण वाहनासह पसार झाला असून त्याचा शोध घेवूनही तो मिळून न आल्याने शहा यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.