इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पचनी पडणे कठीण असल्याने पुढच्या दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे सांगितल्यानंतर त्यावर जोरदार राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे.
या मुलाखतीत शरदचंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल किंवा रणनीती सामूहिक पद्धतीने ठरवली जाते, असे त्यांनी म्हटले आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल; मात्र वैचारिकदृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचणी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.